वर्क फ्रॉम होम आरोग्य टिप्स (Work from Health Tips)

मानसिक व शारीरिक आरोग्य 


वर्क फ्रॉम होम आणि आरोग्याच्या टिप्स 


• कोरोना महामारी नंतर घरात बसून आणि ऑफिसमध्ये बसून दोन्ही प्रकारे काम करण्याची परवानगी दिली गेली. ही नवी पद्धत समाजात अधिक लोकप्रिय होत गेली. आणि ऑफिस स्टाफला देखील ती पद्धत प्रचंड आवडली. पण दुधारी तलवारी सारखी ही सुविधा फायदे तोटे दोन्ही देऊ लागली. पाहूया, काय आहेत त्या मागची कारणे:

मानसिक आणि शारिरीक आरोग्या करिता तज्ञांनी सुचविलेले उपाय:

१. दिवसभराचे वेळापत्रक: (Daily Routine)


• हायब्रिड कामाच्या पद्धतीत वेळेचे व्यवस्थापन (Time Mangement) महत्वाची भूमिका बजावते. रोज नियमित वेळेवर उठणे. नित्यकर्मे आटपून योग्य वेळेवर आपल्या कामाची सुरुवात करणे आणि योग्य वेळी ते काम थांबवणे, उपलब्ध वेळेत ठरवलेले काम नियमानुसार पूर्ण करणे या गोष्टी आवश्यक असतात. यातुन ऑफिसची कामे पूर्ण होतात व वर्षानुवर्षे नियमित रुटिनला सरावलेले शरीर आपल्याला सहकार्य देते.

२. बैठी जीवनशैली: (Sedentary Lifestyle)
रोज ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी करावी लागणारी धावपळ अनेक स्नायुंना चलनवलन व व्यायाम नियमितपणे देत राहते. पण हेच काम घरातुन सुरू केल्यावर मात्र एकाच जागेवर सलग कित्येक तास बसून राहण्याची सवय अनेक व्याधी उत्पन्न करते. पाठदुखी, गुडघेदुखी, मानेची दुखणी, कंबरदुखी असे अनेक आजार उभे राहतात.

• म्हणूनच घरून काम करताना दर दोन तासांनी खुर्चीतून उठून घरातल्या घरात चालणे, स्ट्रेचिंग करणे उपयोगी ठरते. रक्ताभिसरण (Blood Circulation) नियमित सुरू होते, नसा मोकळ्या होतात, पेशी सक्रिय राहतात.
३. शरीराचे पोषण  ( Nourishment for body)

• घरून काम करताना वेळ वाचवण्यासाठी मॅगी, सॅन्डविच किंवा वडापाव समोसे याचसारखे बाहेरून मागवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात येतात असे दिसून आले. ज्यात रासायनिक गोष्टी, कृत्रिम रंग अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात वापरलेल्या असतात. 

• या गोष्टी टाळण्यासाठी शक्यतो घरगुती आहार, पालेभाज्या, डाळी, तुप, कडधान्ये, ज्वारी बाजरी च्या भाकऱ्या, गव्हाच्या पिठाच्या चपात्या,  कच्च्या कोशिंबीरी, दही ताक, ताजी फळे, अशा गोष्टींवर भर दिल्यास निरोगी आरोग्य सतत साथ देईल. याच सोबत नियमित भरपूर पाणी पिणे अजुनच फायदेशीर राहील. 

४. स्क्रिन टाईम नियम २०:२०:२०
(Screen Time Rule 20:2020)


• सलग कित्येक तास काम, सतत मिटिंग्ज, असंख्य मेल्स, प्रेझेंटेशन, या आणि अशाच इतर कामांसाठी स्क्रीनवर पहात सतत काम करून डोळ्यांवर दिवसभर ताण येत राहतो. त्या करिता २०:२०:२० हा नियम आवर्जून पाळुया.

• दर २० मिनीटांनी, २० सेकंदांसाठी, फक्त २० फुट लांबवर असणाऱ्या एखाद्या वस्तूकडे पहा. ज्यामुळे कित्येक तास स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर आलेला ताण सहज दूर करता येऊ शकतो.

५. मानसिक आरोग्य: (Mental Health) 

• घरातून काम करताना अनेक अडचणी येतात. त्यातून निर्माण होणारे ताण तणाव सहजपणे हाताळताना यावा या करिता फावल्या वेळात ध्यानधारणा (Meditation), योगाभ्यास, पुस्तक वाचनाचा छंद, कुटूंबासोबत मोकळ्या गप्पा, मित्रांसोबत संभाषण या गोष्टी मन हलके करतील. मन मोकळे झाल्यासारखे वाटेल.

६. गाढ  झोपेचा आनंद घ्या: (Enjoy a Deep Sleep)

जो लवकर निजे, लवकर उठे, 
त्यास ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे.

 हे जुने वचन आठवतंय का ?  अर्थातच हे तीन लाभ कमावण्यासाठी आपण योग्य वेळेवर झोपणे, आणि सकाळी नियमितपणे उठणे हीच तर यशाची सर्वात मोठी गुरू किल्ली आहे. 

७. एक तरी छंद जोपासा:  (Pursue a hobby)

• आपला दिवस कितीही गडबडीत का जाईना. आपलं मन निवांत क्षणी हळुच कानात कुजबुजतं. तुझा थोडासा वेळ मलाही दे. मी तुझा छंद. मला विसरू नकोस.

• स्वतः करिता राखून ठेवलेल्या वेळे मधला थोडासा वेळ निदान आठवड्यातून एकदा तरी आपल्या छंदाकरिता आपल्या आठवड्याच्या वेळापत्रकात ठेऊया. मग तो पुस्तक वाचन असेल किंवा टीव्ही वरचा आवडता कार्यक्रम न चुकता पाहणं असेल, कुंडीत फुलझाड लावणं असेल किंवा त्याची काळजी घेणं असेल. यातुन नि:स्वार्थ आनंद मिळेल आपल्याला.

• तो छंद  निश्चितच पेन किलर गोळीचं काम करेल.


• निरोप:

• हायब्रीड वर्क कल्चर आरोग्यासाठी नक्की आरामदायी ठरू शकतं. पण तो लाभ घेण्यासाठी योग्य सवयी जर नित्यनेमाने अंमलात आणल्या तरच. आपण प्रत्येकाने शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे वेळच्यावेळी  लक्षं पुरवले तर निश्चितपणे आपले आरोग्य उत्तम राहणार आहे. शेवटी आपली शारीरिक आणि मानसिक संपत्ती फक्त आणि फक्त आपणच नीट सांभाळू शकतो. 

शुभेच्छा.

गुगलचे आभार.

Comments