आयुष्याची तत्वं (Principles of Life)

मानसिक आरोग्य 


आयुष्याची तत्वं

• होय, हा माझा मार्ग आहे आणि माझा हा एकांत मी स्वतःहून निवडलेला आहे. एकटेपणा हा कुणालाही नको असतो. पण हा एकांत मी माझ्या करिता निवडलेला आहे.

• आपलं लहानपण आपल्या प्रत्येकाच्या मनात सदैव जिवंत असतं, मी म्हणेन आपल्या प्रत्येकाच्या मनात बालपण एक लबाड पिल्लु होऊन गपचुप लपून बसलेलं असतं. आयुष्य हळूहळू पुढे सरकत राहतं तेव्हा प्रत्येक वळणावर ते पिल्लू हळुच येऊन आपल्याला भेटून जात राहतं. ते इवलुसं पिल्लू म्हणजे आपलं बालपण जे कधी मोठं होतच नाही. आपल्या स्मृतींत रेंगाळत आपली सोबत करत जन्मभर आपली सोबत करतं .




• ब्रम्हचर्याश्रम संपून गृहस्थाश्रम सुरू होताना फार मजा वाटते. आपण  कुणीतरी फार मोठे झाल्यासारखं वाटून छाताड पुढे काढून  समाजात वावर सुरू करतो.

•आपण कल्पनेत तरंगत ऍक्शन हिरो होऊन सहवासातील माणसांना मोठेपणा दाखवत, भाव खात वावरतो. विवाह होतो, मुलंबाळं येतात, समाजात मोठेपणा वाढतो. मजबूत कमाई करणारा आणि कुटूंबाचा पालनकर्ता होतो, दुचाकी, चारचाकी, मित्रांना पार्ट्या, अगदी ऍक्शन हिरोच्या रूपात वावरताना फार मजा वाटते. 

• या हिरोगिरीत पछाडले गेल्यासारखे आपण वरच्या आस्मानात पोहोचतो होतो. आणि  एक दिवस अचानक  या गृहस्थाश्रमाला वास्तवाची एक अशी  सणसणीत लाथ बसते की हवेत तरंगणारे आपण वानप्रस्थाश्रमात येऊन पोहोचलेलो असतो.



• आता मला बऱ्यापैकी समज आली आहे असं आपल्याला वाटू लागतं.आपण  स्वतः ला एका प्रतिष्ठित, अनुभवी, ज्येष्ठ नागरिक या पदावर पोहोचलेले पाहून  ऊर अभिमानाने भरून येतो. 

• मग असाच काळ हळूहळू पुढे पुढे सरकत राहतो, आपण जुन्या आठवणी गोळा करत राहतो, वर्षे जात राहतात आणि मग अचानक एक दिवस काचेच्या पलिकडे तो म्हातारा दिसतो. ओळखीचा भासतो म्हणून त्याच्या जवळ जाऊन नीट पहावं तेव्हा कळलं तो आरशातुन डोकावणारा तो म्हातारा तर आपणच असतो. 

• हळूहळू हे सत्य स्विकारावंच लागलं की आता माझं राज्य संपलं आहे. मलाही आता माझ्या जबाबदाऱ्या पुढच्या पिढीवर सोपवून त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता निवांत राहून परतीच्या तयारीला लागायचं आहे. 

• माझा हिशोब ज्या  क्षणी संपेल त्याक्षणी मला तयारी करिता एक सेकंद ही उसना न देता मृत्यू मला अलगद उचलणार आहे. त्यापेक्षा तयारीला लागावं हेच बरं. 

• कुटुंबासोबत प्रवासाला निघण्यापूर्वी आपण केवढी तयारी करत असतो. सगळं सोबत घेतलं की नाही पुन्हा पुन्हा पडताळून पहातो. आणि शेवटी मात्र सगळ्यांतून निवृत्त असुनही कोणतीही पूर्व तयारी न करता स्तब्ध बसून राहतो. फक्त परतीच्या प्रवासाचा विचार करत.

• आणि मग मीही ठरवलं रडत कुढत बसण्यापेक्षा हा संन्यासाश्रम पुन्हा एकदा नव्याने जगावं. पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातून जगाकडे पहावे. इतरांकडून  सतत अपेक्षा ठेवण्याची सवय सोडून द्यावी. जुने वाद विवाद मनाच्या गंगेत अर्पण करून टाकावेत. शहाणं बाळ होऊन नियमितपणे औषधं घ्यावी. आयतं पुढ्यात आलेलं ताट विनातक्रार आस्वाद घेत संपवावं. माझा जुना शहाणपणा  गुंडाळून ठेवावा. 



• नव्या पिढीतल्या माझ्या  लेकरांचं  आपली जबाबदारी  स्विकारुन एका आदर्श  पुत्राची भुमिका पार पाडणं आनंदाने स्विकारावं. मुलाचा संसार हा एक सुरेख चित्रपट पहावा तसा, मध्ये जाऊन लुडबुड न करता, फुकटचे सल्ले  न देता अलिप्त होऊन पहावा. मागितला तरच सल्ला द्यायला जावं.

• कधी हट्ट करावा तर कधी लाड करून घ्यावेत. सगळ्या मित्रांना भेटावं, जुन्या मैत्रीणीना ही फेसबुक इंस्टाग्रामवर हळुच शोधावं. निरोप घेऊन दुनियेला अलविदा करून पुढच्या प्रवासा करिता निघालेल्या मित्रांना मी "आपण पुन्हा भेटणारच" सांगुन हळूच अश्रू पुसत निरोप द्यावा.

• आणि शेवटी मी आयुष्यभर सोबत करणाऱ्या बालपण
या पिल्लाच्या च्या गळ्यात गळा घालून गाढ झोपी जावं. काय माहीत पुढच्या प्रवासा करिता सोबत घेऊन जायला परमपिता परमेश्वर कधीतरी मला हळूच उचलून घेऊन जाईल. तोवर मी आणि बालपण रूपी पिलू दोघं भरभरून जगुन घ्यावं.

• आणि जेव्हा माझा परम पिता परमेश्वर मला विचारेल चिमण्या बाळा पृथ्वीवर  आयुष्याच्या शाळेत काय बरं शिकुन आलास ? तेव्हा त्याला मनापासून सांगेन. पित्या, असंख्य अनुभव घेतले, एकच तत्वं नीट शिकुन आलो, कुणाला कितीही वाटलं की माझ्या सोबत सगळी दुनिया आहे, मला भरपूर सलाम आहेत, रग्गड पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, नावलौकिक आहे. पण ते सगळं क्षणभंगुर होतं रे.

• हे सगळं कमवायला भले मला संपूर्ण आयुष्याची किंमत मोजावी लागली असेल. पण हे सगळं जिथल्या तिथेच ठेवून मला निघावं लागलं आहे. जे सर्व मी पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. मी फक्त माझी भली बुरी कर्म माझ्या सोबत घेऊन आलो आहे. 

• जीवनातले आभासी टेकू हळूहळू गळून पडत जातात. आणि उर्वरित प्रवासासाठी माणूस एकटा उरतो. बालपण रूपी पिलू शांतपणे आपल्या मांडीवर डोके ठेवून निश्चिंत होऊन गाढ झोपलेलं असतं.

• शुभेच्छा.

Comments