एकटेपणा (Lonliness)
मानसिक आरोग्य
यात ही कुठे चुकली ?
(ह्या दोन्ही मी आयुष्यात अनुभवलेल्या सत्य घटना आहेत. इथे मी नावे आणि संदर्भ बदललेले आहेत. यातील गोष्टींचे कुणाच्या जीवनात साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती.)
अनुभव क्रमांक १
• मैत्रीणीच्या मोठ्या भावाच्या लग्नाला जाणं झालं, मी वर पक्षाकडून होते. त्यामुळे नवरी मुलगी पाहण्याची उत्सुकता होती. जेव्हा वधू पाहिली तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. कारण ती माझी कॉलेज मधली क्लासमेट होती.
• सविता. शांत, अलिप्त, कुणा मध्ये फारशी न मिळणारं, स्वतः मध्ये गर्क होऊन जगणारं असं ते व्यक्तिमत्व मला फार आवडलं आणि आमची मैत्री झाली. ती मध्यम वर्गीय होती. कॉलेजचं शिक्षण ही देखील तिच्या करिता न परवडणारी गोष्ट होती. पदवी मिळाल्या नंतर आम्ही सर्वत्र पांगलो. तेव्हा मोबाईल युग नसल्याने कोण कुठे गेलं हे कळायला मार्ग नव्हता. पण ती स्मरणांत राहिली. आणि आज ती इथे भेटली.
• तिला श्रीमंत सासर मिळाल्याचा आनंद तिच्या कुटूंबियांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पण माझ्या पोटात गोळा आला. कारण नवरा मुलगा हा सधन कुटुंबातील एक लाडावलेला सुपुत्र होता. चुकीची संगत, व्यसनीपणा, बाहेरख्यालीपणा, संस्कारांचा गंध नसणारा, वागण्या बोलण्याचं तारतम्य नसणारा एक फिल्मी हिरो होता. आई वडिलांनी अति लाडावलेला, वास्तवाचे चटके न खाल्लेला, जबाबदाऱ्यांची जाणीव नसणारा तो एक खुशालचेंडू असण्या बद्दल प्रसिद्ध असामी होता. त्याच्या सधनतेकडे पाहून सलामी ठोकणाऱ्यांवर तो मेहेरबान होता. फसली बिचारी ! पण आता करणार काय ?
• काळ सरत राहिला, जो तो संसार, नोकऱ्या, मुलंबाळं या प्रपंचात गुरफटला. आणि अचानक एक दिवस बातमी आली. सविताचा नवरा वारला. हादरा बसला. आम्ही तडक भेटायला धावलो. सविता, शांत, निश्चल, हरवल्या सारखी होऊन भींतीला टेकून बसलेली होती. ना अश्रू होते ना कोणत्याही भावना. भेटायला येणारे सांत्वन देत होते, जात होते. ती कोणाकडेच पाहत नव्हती. ती एकटीच उरली होती. त्यापुढे समाजातील, नात्यांतील सर्व सदस्यांनी तिच्याशी संबंध तोडले आणि कालांतराने ती देखील पतीने जाताना दिलेल्या भेटी मुळे HIV ग्रस्त होऊन वारली.
• मला प्रश्न पडला. आयुष्यात कोणाकडेच मान वर न करून पाहणारी, अती आज्ञाधारक ही सखी. इतकी वाळीत का टाकली गेली. यात हिची चूक काय होती ?
• पदवी घेतली, आईवडिलांनी निवडलेल्या श्रीमंत घरातील मुलाशी विवाह केला. सदैव आज्ञेत राहूनही दुनियेकडून मात्र लाथाडली गेली. यात हिची नेमकी चूक काय होती ?
अनुभव क्रमांक २
• ही मैत्रीण आई वडिलांच्या होकाराची वाट बघत अनेक वर्षे प्रेम विवाह करायची थांबली. माहेरचा नकार असला तरीही सासर कडून होकार होता हीच एक आनंदाची (?) बाब होती. आपण आता शिक्षण पूर्ण करू आणि स्वतःच्या पायावर उभं राहून पुढचा पुढचा निर्णय घेऊ अशी भुमिका दोघांनी घेतली. वाट पाहूनही माहेरचे शेवट पर्यंत बधले नाहीत.
• अखेर दोघांनी रजिस्टर मॅरेज उरकलं. आणि त्यांना एक गोड पुत्र देखील झाला. सगळं छान चाललं होतं आणि लवकरच अचानक भरधाव बाईक चालवताना ट्रकच्या खाली आल्याने तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. आणि सगळ्यांनी मुखवटे उतरवून खरे चेहरे दाखवायला सुरुवात केली.
• सासरी तिला रातोरात भांडणं उकरून नवऱ्याच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीतून बेदखल करण्यात आले. घर सोडण्यास प्रवृत्त केले गेले.
• ती एक वर्षाचं मुल मांडीवर घेऊन रात्रभर रेल्वे स्टेशनवर बसून होती. अनाथ, एकाकी झाल्या सारखी. आता तिला एकटीला न्यायालयाचे दरवाजे ठोठावायचे होते.
• कालांतराने तळतळाट देत सही आई वडिलांनी घरात निवारा दिला. तिच्या जवळही अन्य पर्याय नव्हता. आणि तिने टोमणे मारणारे, वाईट नजरेने पाहणारे, शहाणपणा शिकवणारे, तू कशी चुकलीस असे ज्ञानाचे भले मोठे धडे देणारे, आता तुझी इज्जत संपली हे फुकटचे तत्वज्ञान शिकवणारे अनेक महापंडित भेटले. आजही भेटतात. शिक्षण, नोकरी, हिंमत आणि सहनशीलता यावर ती तरली. मुलाला मोठं करतानाही तिचा संघर्ष सुरूच राहीला. पुन्हा विवाह करण्यास तिने ठाम नकार दिला. इतकी ती पोळली गेली होती
• फक्त स्त्रीच सगळं भोगते असं नाही, पुरुषांनाही स्त्रियां पासून होणारे मनस्ताप, फसवणूक, भावनिक टॉर्चर असे अनेक किस्से आपल्याच अवती भवती असतात. आपण मात्र भरल्या ताटावर बसून, तृप्तीच्या ढेकरा देत इतरांना शहाणपण शिकवत फिरतो आहोत. याची जाणीव झाली आणि सगळ्यात आधी स्वतः वर थुंकावसं वाटतं.
• ही नियती आहे. कुणाचे आधी कुणाचे नंतर असे प्रत्येकाचे आपापल्या वाट्याला येणारे भोग आपली वाट बघत उभे आहेत. जेव्हा अश्या घटना घडलेल्या दिसतील तेव्हा नियती बोलेल, "इतरां विषयी बोलायला ओठ उघडण्याआधी लक्षात ठेव, काल पुरुष तुझ्या प्रत्येक कर्माची नोंद ठेवतो आहे. तु जे देशील तेच पुन्हा तुला मिळेल. आता निवड कर."
• आपण आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. सगळ्या सुखांत स्वतः ला लोळताना, खुष होताना आपण स्वतःला सांगुया "बाळा ! स्वतः वर लक्षं ठेव"
• शुभेच्छा.
गुगलचे आभार.
Comments
Post a Comment