मेंदूचे व्यायाम (Tips for Brain Exercises)
मानसिक आरोग्य
मेंदूचे व्यायाम (Brain Exercises to Reduce Mental Stress.)
• मेंदूची भूमिका कोणती ?
• माणसाचा मेंदू हा एक जटिल अवयव आहे. आणि आश्चर्य हेच की आपला हाच गुंतागुंतीचा मेंदू आपल्या शरीराला सुरळीतपणे चालवत असतो.
• शरीरातील विचार, स्मृती, भावना, स्पर्श, चव, दृष्टी, श्वासोच्छवास, तापमानाची नोंद, तहान, भूक अगदी सगळं काही तो एकटा नियंत्रित करत असतो. मेंदू मुळेच आपल्याला सर्व गोष्टींची जाणीव होत राहते, संवेदना जाणवत राहतात. मेंदू हे स्मृती, बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती या सर्व गोष्टी एकटा हाताळत असतो. यातील कोट्यवधी मेंदूपेशी संपूर्ण शरीर चालवत राहतात.
• मेंदूचे व्यायाम म्हणजे नेमके काय ?
मेंदूचे व्यायाम म्हणजे मेंदूची कार्यक्षमता सुधारण्याच्या हेतूने केल्या जाणाऱ्या गोष्टी. ज्यामुळे मेंदूची ताकद, आकार व तल्लखपणा व्यवस्थित राहते.
• मेंदूचे व्यायाम का आवश्यक ठरतात.
माणूस जन्माला आल्या पासून ते शेवटच्या श्वासापर्यंत मेंदू सतत त्याची जबाबदारी क्षणाचीही उसंत न घेता नित्यनेमाने पार पाडत असतो. अगदी आपण गाढ झोपेत असलो तरीही मेंदू सदैव दक्षतेने त्याची कामे पार पाडत रहातो.
आणि म्हणूनच आपल्या स्मृती, एकाग्रता, दररोज पार पाडावी लागणारी कामे यात आपण उत्तम क्षमतेने पार व्हावे असे वाटत असेल तर मेंदूकडून साधे सोपे व्यायाम नियमित करून घेत रहाणे आवश्यक ठरते.
• काय असतात हे मेंदूचे व्यायाम ?
१. ध्यानधारणा
दररोज नियमितपणे ध्यानधारणा करणे हे मेंदू आणि शरीर दोन्हीं करिता फायदेशीर ठरते. शास्त्रीय नियमानुसार ध्यानधारणा मेंदूचे वृद्धत्व कमी करून माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी मेंदूची क्षमता वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात.
२. क्रॉसवर्डस आणि पझल्स
क्रॉसवर्डस आणि विविध कोडी ही एक लोकप्रिय गोष्ट आहे. जी मेंदूला उत्तेजित (Activate) करते.
३. सूडोकु आणि बुद्धिबळ
सुडोकु आणि बुद्धिबळ ही कोडी देखील मेंदूचा व्यायाम सोपा करून एक मानसिक व्यायामाची भूमिका पार पाडताना दिसतात. या खेळांमधून मानसिक तणाव देणारा भकास रिकामा वेळ एका सोप्या व्यायामात सहज बदलता येतो.
अशाच प्रकारच्या बुद्धिबळ या खेळातून देखील मानसिक विकास वृद्धिंगत करता येतो.
४. नविन कौशल्ये शिकणे
ड्रायव्हिंग, एखादे वाद्य वाजवायला शिकणं, नवा पदार्थ ट्राय करून पाहणं, विणकाम, भरतकाम, चित्रकला किंवा यांसारखे नविन जे कधीच केलेले नाही ते शिकण्यातून एक आनंद गवसेल. जे मेंदूला एक व्यायाम ठरेल.
५. संगीत ऐका
आपल्याला आवडणारी गाणी ऐकणे, कधी कधी ओमकाराचा शांत निवांत ध्वनी ऐकणे, कधी नाट्यसंगीत तर कधी चित्रपट गीते त्या सोबत असणारे परिचयाचे संगीत ऐकण्यात मेंदूचे वेगवेगळे भाग गुंततात असे संशोधकांचे म्हणणे आहे. या सोप्या आणि सामान्य कामाचे आरोग्या करिता अनेक लाभ आहेत. शांतपणे एका जागेवर बसून किंवा फेऱ्या मारत हळूच गुणगुणत जगताना आपण हा एक मानसिक व्यायाम करतो आहोत असं जाणवणार देखील नाही.
६. नियमित व्यायाम करा
नियमितपणे व्यायाम करणे हे निरोगी आरोग्या करिता एक मोठे वरदान आहे. हे व्यायाम शरीर आणि मेंदू दोन्हींच्या निरोगीपणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्यातून शरीर लवचिक आणि ऍक्टिव तर राहतेच पण स्मरणशक्ती, आकलनशक्ती हर क्षणी सजग राहतात.
७. खोल श्वासोच्छवास
१-२-३ मनातल्या मनात मोजत हळूहळू श्वास भरत जाणे. १-२-३ मोजत श्वास धरून ठेवणे आणि त्यानंतर मात्र १-२-३-४-५ मोजत हळूहळू श्वास सोडणे ही खोलवर श्वासोच्छवासाची योग क्रिया पाच दहा मिनिटे करणे खूप फायदेशीर होते.
मानसिक शांतता मिळण्यासाठी ही गोष्ट खूप उपयोगी दिसून येते. असे दिवसातून दोन तीन वेळा केल्यास मन:स्थिती उत्साही आनंदी झालेली स्पष्टपणे जाणवते
कधी तणाव आला, कधी चित्तवृत्ती उदास नाराज जाणवली तरीही यातून मन शांत, निवांत विनासायास करता येते. जिथे ह्या करिता आपण गोळ्यांची मदत घेत सुटतो आणि फ्री मध्ये मिळणारे औषधांचे साईड इफेक्ट्स निस्तरत बसतो.
८. डायरी लिहावी
आपण खरोखरच दररोज निरनिराळे अनुभव घेतच पुढे पुढे जात राहतो. कधी आनंद तर कधी दु:ख, कधी शांत निवांत मन तर कधी मनस्ताप, कधी आशावादी बनतो तर कधी आयुष्याला विटतो. मन खट्याळ लहान वासरासारखं क्षणात रंग पालटतं. डायरीत मन लिहिणं हे एका जिवलग माणसाला सांगून मन हलकं करण्या सारखं असतं.
आपलं सुख दुःख आपल्याला ठाऊक असतं. चिमुकली गोष्ट असो किंवा पर्वता एवढी, आपलं सुख दुःख आपलं आपल्यालाच भोगायचं असतं. अशा वेळी मन कोणाला सांगणार ? अर्थात आपल्या डायरीला.
दररोज नियमितपणे डायरी लिहिली तर जवळच्या व्यक्तीसोबत बोलून मन हलकं करण्यात सारखंच सहज बरं वाटतं. इतर कुणाची अपेक्षा नको.
• काय असतात मेंदू च्या या व्यायामांचे फायदे ?
१. मेंदूच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.
२. हाती येणारी कामे सुरु करायला मेंदू तत्पर असतो.
३. एखादे काम हाती घेतल्यावर ते पूर्ण होईपर्यंत मेंदू सगळे अडथळे पार करत अंतिम मुक्कामापर्यंत आपल्याला घेऊन जातो.
४. स्मरणशक्ती वाढते, समजुन घेण्याची क्षमता वाढते.
५. तणावाची पातळी कमी होते.
• आपण आता दररोज ह्या मेंदूच्या व्यायामाची साथ आपल्या दिनक्रमा सोबत घेऊन चालणार हा निर्धार करूया.
• आपल्याला हा लेख कसा वाटला याविषयी मला सांगायला विसरू नका. आणखी कोणत्या विषयावर वाचायला आवडेल हे नक्की सांगा.
• मनापासून आभार. धन्यवाद 🙏
• गुगलचे आभार.
Comments
Post a Comment