उन्हाळ्याचे आरोग्यविषयक घरगुती उपाय ( Summer Season Home Remedies)
शारीरिक आरोग्य
ठंडा ठंडा कुल कुल उन्हाळा २०२५
उन्हाळा आणि थंड थंड ?? वाचून काही तरी विचित्र वाटलं का ? या वर्षीचा हा तर उन्हाळा सुरू देखील झाला आहे.
हा "ऍंग्री यंग मॅन" उन्हाळा स्वतः चे गुणधर्म काही सोडणार नाही. मग आपणच त्याला गारेगार करून टाकुया नं. ते कसं ...? चला पाहूया.
१) जेवणात द्रव पदार्थ.
• आपल्या अन्नात घन पदार्थांचे प्रमाण (solids) कमी करूया आणि द्रव ( liquids) पदार्थांचेप्रमाण वाढवुया. उदाहरण म्हणजे ताक, ताकाची कढी, दही, कोकमाचं सार, चिंचेची कढी, कैरीचे सार अशा अनेक गोष्टी भाता सोबत आपली वाट पाहत तयारीत बसल्या आहेत आहेत. चला ! वर्षातून एकदा येणाऱ्या उन्हाळ्यात हे घटपटीत आंबट गोड पदार्थ खायची मज्जा तर लुटूया. यातून अनेक उष्णतेमुळे येणारे आजार आणि त्रास सहज टाळता येतील.
२) सरबते
• काय म्हणता ! गारेगार काही तरी प्यावसं वाटतंय ? मग लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचं पन्हं, कलिंगड ज्यूस, संत्री मोसंबी ज्यूस खास चटपटीत मसाला टाकून तयारीतच आहेत. ती शीतपेये (cold drinks) आपले साईड इफेक्ट्स घेऊन भेटायला येतील तेव्हा जरा जपून त्यांचा आस्वाद कमी प्रमाणात घेणं बरं अन्यथा त्यात असणाऱ्या भरपूर साखरेचं प्रमाण अजून एक आजार भेट म्हणून देऊन जाईल. सतर्क राहूया.
३) कपडे
• आपण घरात असो किंवा बाहेर जायला निघालेलो असो, कॉटनचेच कपडे दररोज जास्त प्रमाणात वापर करण्याला प्राधान्य देऊया. ढिलेढाले, हलक्या वजनाचे, फिक्या रंगाचे कपडे गरमागरम हवे पासून खरंच आराम देतील. असह्य उन्हाळ्याचा त्रास कमी करतील. घाम अंगावर तसाच राहिला, सुकला की त्वचेतच मुरतो आणि घामोळे येतात. आणि म्हणूनच घट्ट तसेच रेशमी कपडे टाळून मोकळे, सैलसर व सुती कपडे वापरणे आवश्यक ठरते.
४) महत्त्वाच्या गोष्टी
• गॉगल, स्कार्फ, डोक्यावर घालण्यासाठी टोपी, घेतल्या शिवाय घराबाहेर पडायचं नाही. हो! आणि बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर, मानेवर, हातांना सनस्क्रीन आठवणीने लावून मगच घराबाहेर पडायचं आहे. आवश्यकता भासेल तेव्हा थंड स्प्रे चा शिडकाव करून बाहेर पडायचं ध्यानात असू दे. घाम पुसण्यासाठी एक रूमाल कायम सोबत असलाच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, पाण्याची एक बाटली सोबत बाळगायची आहे. घरात असो किंवा घराबाहेर ती बाटली सतत सोबत असायलाच हवी.
५) आहार
• आहार हा उन्हाळ्यात सौम्यच घेणं फायदेशीर राहील. रसाळ सुप्स, छान छान मुळा, गाजर, काकडी या थंडगार फळभाज्यांची दही घालून केलेली कोशिंबीर. लाजवाब. त्यात भर म्हणून पालेभाज्या किंवा पालकाचे किंवा मुळ्याचे चटक मटक पराठे आणि मठ्ठा. वाह वाह! असा थंडगार सौम्य आहार उन्हाळ्याची मजा वाढवेल यात शंकाच नाही. सोबत दहीवडे, दहीपुरी, दही मिसळ, दही भेळ. हे ही पर्याय आहेतच की. ग्रेट!
इतर गोष्टी म्हणजे इलेकट्रॉल, ORS, ग्लुकोज, (शुगर असणाऱ्यांनी यापासून दूर रहावे) सोबतीला असणारच आहेत.
६) इतर गोष्टी
• घर गार ठेवण्याचा प्रयत्न करा. हवा खेळती राहिल असे पहा. दिवस सुरू झाल्यावर उष्णता वाढण्याच्या आत स्वयंपाक, बाहेरची कामे उरकणे इ. गोष्टी सकाळीच करून टाका. म्हणजे उष्णतेशी सामना करणं अर्थातच सोपं राहील.
७) व्यायाम कमी
• उन्हाळ्यात व्यायाम जरा कमी प्रमाणात करणे फायदेशीर राहते. हलके फुलके व्यायाम शीरा नसा मोकळ्या करतील आणि उत्साह देतील. घामाघूम होईपर्यंत व्यायाम करणे टाळा. केला तरी सुर्योदयाच्य सुमारास जेव्हा गरमी जाणवत नाही तेव्हा करावा.
अनवाणी पायांनी सुर्यास्ताच्या सुमारास बागेत चालणे शरीरातील उष्णता कमी करून थंडावा वाढवेल.
८) मुडी उन्हाळा
• हा उन्हाळा येतो आणि मुड खराब करतो, थकवा, चिडचिड, उत्साह नसणे जाणवत राहते. कारण वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होत राहते.
• मेंदूला ऑक्सिजन आणि पोषणासाठी आवश्यक पुरवठा कमी जास्त होत राहून चिडचिड, डोकेदुखी तत्सम समस्या डोके वर काढतात. हे उन्हाळ्यात येणारे मुड स्विंग्ज् म्हणून ओळखले जातात. मस्त गाणी ऐका, गुणगुणा.
• थंडगार पाण्याने दिवसांतून दोनदा छानशी आंघोळ करा आणि स्वच्छ मनाने उर्वरित दिवसाला सामोरे जा.
९) हे टाळूया
✓ हॉटेल मधून अती तेलकट तिखट पदार्थ मागवून खाणे त्रासदायक ठरते.
• उन्हाळ्यात फुड पॉयजनिंइची शक्यता जास्त असते. आणि हॉटेलमधील पदार्थ फ्रिजमध्ये आधीच तयार करून ठेवलेले ऐनवेळी नव्याने नटवुन आपल्या समोर सादर केलेले असतात. म्हणूनच उन्हाळ्यात ताजे शिजवून खालेले अन्न पचनासाठी सोयीस्कर ठरते.
✓ अती प्रमाणात आईस्क्रीम खाणे.
यातून साखर अधिक प्रमाणात पोटात जाते आणि अनेक त्रास उद्भवतात जे आपल्या फार उशिरा ध्यानात येतात जेव्हा त्यांच्या सोबत औषधे आणि पत्थ्ये लादली जातात.
✓ नॉनव्हेज कमी प्रमाणात खाणे.
• उन्हाळ्यात तेलकट मसालेदार तिखट पदार्थ पचनाकरिता जड असतात. ज्यामुळे पोट बिघडते. दिवसभर अस्वस्थ बेचैन वाटत राहते.
• पचनशक्ती नाजूक झालेली असते.
• सतत पाणी पिऊन पोट भरत जाते.
• ते शक्य होईल तितके टाळण्यात येते.
निरोप:
आयुष्यात बदल हे कायम येतच राहणार आहेत. निसर्ग आपल्या सोबत अनेक आनंददायी बदल हे भेटींच्या स्वरूपात सतत घेऊन येत राहणार. थोडा आनंद, थोडं दुःख, थोडा आराम थोडे श्रम आयुष्यभर हे चालतच राहणार. आपला दृष्टिकोन आपल्याला ज्या त्या गोष्टीला योग्य किंवा अयोग्य ठरवायला कायम मदत करेल. तेव्हा साध्यासुध्या बदलांतून होणारा अर्थ उमजून हे जीवन आनंदात जगुया.
सुंदर उन्हाळ्याच्या गार गार शुभेच्छा.
![]() |
गुगल डॉट कॉम चे मनापासून आभार.
Comments
Post a Comment