रात्रीचा आहार (Dinner at Night)

शारीरिक आरोग्य 

रात्रीचा आहार (Dinner at Night) 

संपूर्ण दिवस संपला की रात्री आपल्या परिवारा सोबत एकत्र बसून भोजनाचा आनंद घेणं आपल्याला फार आवडतं. दिवसभरात झालेल्या घडामोडी एकमेकांना  सांगत, हसतखेळत हे भोजन चालतं आणि पोट जरा जास्तीच भरल्या सारखं वाटतं.

 इथे कदाचित आपण जाणून बुजून या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो की हा आपला गोंडस बाळसेदार ते  भयंकर वजनदार होण्याचा एक प्रवास आता सुरू झालेला आहे. रोज असंच चालत राहिलं तर या प्रवासात अनेक स्टेशन्स लागणार आहेत जी डायबिटीस, हार्ट डिसिजेस, ब्लड प्रेशर वगैरे वगैरे वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहेत. तेव्हा ध्यानात येतं की "आपण याआधीच अलर्ट रहायला हवं होतं". चला, उशीर होण्याआधी जागे होऊन तयारीला लागु या. आणि म्हणूनच रात्रीच्या भोजनात काय खावं यापेक्षा काय खाऊ नये याचा आज आपण इथे विचार करूया.

रात्रीच्या आहारातून कोणते पदार्थ वर्ज्य करावेत?

आहाराचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. विशेषतः रात्री घेतलेला आहार आपल्या पचनसंस्थेवर आणि झोपेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम करू शकतो. जर योग्य आहार न घेतला गेला, तर अपचन, ऍसिडिटी, गॅसेस आणि वजन वाढ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच, रात्रीच्या वेळी जड आणि अपायकारक पदार्थ टाळणे आवश्यक आहे. या लेखात आपण रात्रीच्या आहारातून वर्ज्य करावेत असे काही पदार्थ पाहणार आहोत.

१. तळलेले आणि जड पदार्थ (Fried and Heavy Food)

✓ रात्रीच्या जेवणात तळलेले आणि सोडा घातलेले  जड पदार्थ खाणे टाळावेत. पापड, समोसे, भजी, पकोडे, वडा, पुऱ्या अशा तळकट पदार्थांमुळे पचनक्रिया मंदावते आणि अपचनाची समस्या निर्माण होते.

 ✓ झोपायला जाण्याच्या आधी खाणं म्हणजे जे खाल्ले त्या अन्नाच्या पचना करिता आपल्या जवळ फार कमी तास शिल्लक आहेत असा होतो. तेवढ्या उरलेल्या कमी वेळात दिवसभरा इतकी शरीराची हालचाल होण्याची शक्यता नसते. आणि रात्रभर शरीर अविचल एका जागी पडून असतं

✓ जास्त तेलकट  पदार्थ हे शरीरात चरबी साठवण्याचे प्रमाण वाढवतात, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका संभवतो.

२. मसालेदार आणि तिखट पदार्थ (Spicy Food)

✓ अती मसालेदार आणि तिखट पदार्थ रात्रीच्या वेळी खाणे टाळावे. कारण हे  पदार्थ पचनसंस्थेसाठी मुळातच भर दिवसा देखील जड असतात. 

✓ ऍसिडिटी तसेच छातीत जळजळ होण्यास हेच  पदार्थ कारणीभूत ठरतात. त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि रात्री अस्वस्थ वाटते. रात्रभर बेचैनी काढावी लागते.

३. कडधान्य आणि जड डाळी (Pulses and Lentils". )

✓ राजमा, चणे, चणाडाळ, मसूर आणि तूर डाळी यांसारख्या कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर खूप मोठ्या प्रमाणात असते. या गोष्टी पचनासाठी सहज सोप्या नसतात.

✓ रात्रीच्या वेळी ही कडधान्ये पचायला फार कठीण जातात. त्यामुळे पोट फुगणे, अपचन आणि गॅसेसच्या तक्रारी वाढू शकतात.

४. जास्त मीठ आणि साखर असलेले पदार्थ (Salty and Sweet Dishesh)

✓ रात्री जास्त मीठ आणि साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे. मीठ जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरात पाणी साठते आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो. (लोणची, चटण्या , सॉसेजेस, जॅम इ.)

✓ गोड पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढ होते आणि झोपेमध्ये अडथळे निर्माण होतात.

५. कॅफिनयुक्त पदार्थ - चहा, कॉफी, सोडा (Sweets and Caffeine Material)

✓ चहा, कॉफी, सोडा आणि इतर कॅफिनयुक्त पदार्थ झोपण्याच्या काही तास आधी घेतले, तर त्याचा परिणाम झोपेवर होतो. 

✓ कॅफिनमुळे मेंदू अधिक सतर्क राहतो आणि त्यामुळे गाढ झोप न लागणे किंवा रात्रभर उडती झोप लागणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

६. गोड पदार्थ आणि बेकरी उत्पादने (Bakery Products)

✓ बिस्किटे, केक, पेस्ट्री, डोनट्स, मिठाईचे जिन्नस यांसारखे गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ शरीरातील साखरेचे प्रमाण अचानक वाढवतात आणि त्यामुळे वजन वाढू शकते. तसाही मैदा पचनासाठी कधीच उत्तम नसतो.

✓ हे पदार्थ रात्रीच्या वेळी घेतल्यास शरीरातील चरबीचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि लठ्ठपणाचा धोका हमखास वाढतो.


७. सॉस आणि जड ग्रेव्हीचे पदार्थ (Sauces and Gravies)

✓ रात्रीच्या वेळी जड ग्रेव्ही आणि सॉसयुक्त पदार्थ टाळावेत. हमखास अजीर्ण आणि ऍसिडिटी उद्भवते. ढेकरा, अपचन, पोट जड वाटणे, बद्धकोष्ठता असे अनेक त्रास उद्भवतात.

चीज किंवा लोणीयुक्त पदार्थ पचायला अवघड असतात आणि त्यामुळे रात्री सेवन केल्यास झोपताना अस्वस्थता वाटते.

८. मद्य आणि सिगारेट (Wine and Cigarette) 

✓ रात्री मद्यपान केल्याने झोपेच्या चक्रावर परिणाम होतो. मद्यामुळे शरीर झपाट्याने डिहायड्रेट होते आणि त्यामुळे सकाळी थकवा जाणवतो. 

✓ सिगारेटमधील निकोटिनमुळे झोपेवर वाईट परिणाम होतात.


९. उशिरा किंवा जड जेवण (Heavy Food)

✓ रात्री उशिरा जेवणे किंवा जास्त प्रमाणात जेवण घेणे टाळावे. शरीराचा पचनक्रियेसाठी एक निश्चित वेळ असतो. उशिरा खाल्ल्यास पचनसंस्था संथ होते आणि झोपताना अस्वस्थ वाटते. त्यामुळे रात्री हलका फुलका आणि लवकर जेवण घेणे  खूपच आवश्यक आहे.

१०. थंड पदार्थ आणि आइस्क्रीम (Icecreams)

✓ थंड पदार्थ जसे की आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स आणि फ्रिजमधील अन्नपदार्थ रात्रीच्या वेळी टाळावेत. 

✓असे पदार्थ घेतल्याने घसा खवखवणे, सर्दी आणि पचनसंस्थेच्या समस्या होऊ शकतात.


  मग रात्री मी खाऊ तरी काय  ?

✓ जर तुम्हाला चांगली झोप आणि उत्तम आरोग्य हवे असेल, तर रात्री हलका आणि पचायला सोपा आहार घ्यावा. काही उत्तम पर्याय खालीलप्रमाणे –

• कच्च्या कोशिंबीरी .

• मूगडाळीची खिचडी.

• उकडलेल्या मुग मटकीची कांदा टोमॅटो मिसळून भेळ.

• सूप्स.

• गरम दूध.

• ताजी फळे.

• कमी तिखट आणि चवदार पोळी-भाजी.

निष्कर्ष

• रात्र होण्याआधी शक्य तितक्या लवकर योग्य  आहार घेतल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

जड, तळकट, मसालेदार आणि गोड पदार्थ टाळल्यास पचनसंस्था निरोगी राहते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. म्हणूनच रात्री पचनासाठी हलका आणि पौष्टिक आहार घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

•  यापुढे आपण रात्रीच्या भोजनावर लक्षं ठेऊया आणि नेहमी आपापली काळजी घेऊया. 

•  विवाह रिसेप्शन, नातलगांनी ठेवलेल्या समारंभात आपल्याला आपले नियम कधी कधी बाजूला ठेवावे लागतात. अशा वेळी दुसऱ्या दिवशी  थोडा अल्प आहार घेणे किंवा  उपवास  करून पोट पुन्हा ताळ्यावर आणणे फायदेशीर ठरते.

तात्पर्य

✓ हे शरीर आयुष्यभर आपली सोबत करतं आणि आपलं निरोगी जीवन हसत खेळत सुरू ठेवतं.  म्हणूनच त्याची भाषा समजून घेऊया आणि त्याची काळजी घेण्याची स्वतःला सवय लावून घेऊया.

• माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना संतुलित आहारासाठी आणि त्या सोबत निरोगी पोटासाठी अनेक शुभेच्छा.

• काळजी घ्या.🌹

गुगलचे मनापासून आभार. 🙏

Comments